मुंबई - 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आल्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियातून अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. याच दरम्यान आता मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भूमिका घेऊ असं म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"मला यावर काहीही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. किरण यांचा आरोप आहे की, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल" असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
... म्हणून मी केवळ शरद पवारांकडेच गेलो, किरण मानेंनी सांगितली 'मन की बात'
किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, आता शरद पवार मी मांडलेल्या बाजुवर जे निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असेही माने यांनी म्हटलं आहे. मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण. मी शरद पवार यांच्याकडेच का गेलो तर, शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. भारतातील कला क्षेत्राचं त्यांना प्रचंड ज्ञान आहे, अभ्यास आहे. त्यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही, बाकीचे उथळपणाने प्रतिक्रिया देणारे नेत आहेत. मी त्यांचा प्रचंड आदर करतो, म्हणून ते जर म्हणाले की, एखादी गोष्ट विचार न करता कर, तर मी ती नाही करणार, मी अंधपणे होकार नाही देत. पण, माझी बाजू त्यांच्याकडे मांडावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, असे किरण माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शरद पवारांपुढे मी माझी बाजू मांडली आहे, ते आता काय करायचं ते पाहतील. त्यांनी माझी बाजू घेतली तरी चालेल, नाही घेतली, मला शासन केलं तरी मला आवडेल. कारण, एका अभ्यासू माणसापुढे माझी बाजू मी ठेवलीय, असेही माने यांनी म्हटलं. दरम्यान, याप्रकरणात चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनी उडी घेतली आहे. एखाद्याचं मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे, अशी रोखठोक भूमिका समीर विद्वांस यांनी घेतली आहे. किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरुन त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे", असं समीर विद्वांस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.