"उचलून बत्तीशी बाहेर काढू"; अबू आझमींच्या इशाऱ्यानंतर मनसे म्हणते, "पुन्हा तसेच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 01:59 PM2024-07-21T13:59:10+5:302024-07-21T14:00:00+5:30
मुंबईत समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान करत विरोधकांना इशारा दिला.
MNS Reply to Abu Azmi : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी नाव न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गंभीर इशारा दिला. जोपर्यंत प्रेमाने वागतात तोपर्यंत ठीक अन्यथा उचलून बत्तीशी बाहेर काढू. उत्तर प्रदेशातील लोकांनी माझ्यासोबत राहावे. मग कुणी माई का लाल मुंबईत तुमच्या केसांना धक्का लावू शकत नसल्याचे अबू आझमी म्हणाले होते. अबू आझमी यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता मनसेने प्रत्युत्तर दिलं. पक्षाच्या नेत्यावर टीका झाल्यास गप्प बसणार नाही असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला.
मुंबईत समाजवादी पक्षाच्या खासदारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अबु आझमींनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याबाबत आपलं मत मांडले. "जेव्हा उत्तर भारतीयांवर अन्याय होतो तेव्हा कोण उभा राहतो? आम्हाला सरकार सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना देते. मी तर केवळ लाठी मागितली होती. मारू नका पण मारही खावू नका असं म्हटलं. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला. तो बोलला तलवार वाटू. पण मर्दांसमोर तलवारीचं महत्त्व काय, ही काठी गांधींची आहे जी भल्याभल्यांना ठीक करते," असं अबू आझमी म्हणाले.
"जेव्हा आमच्या लोकांवर हल्ला केला तेव्हा कुणी तुमच्या मदतीला आलं नाही. मी त्या व्यक्तीचं नाव घेऊन तोंड खराब करू इच्छित नाही. त्याने किती उत्तर भारतीयांना मारलं, दुकाने फोडली, हत्याही झाली मात्र तो कधी जेलला गेला का, एकदा मला गृहमंत्री बनवा, एकदा बनलो ना अनेकांना त्यांची आजी आठवेल," असे विधान अबू आझमी यांनी केले.
उत्तर भारतीयांच्या नादी लागू नका, अन्यथा बत्तीशी बाहेर काढू असा इशारा अबू आझमी यांनी दिला. यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली. "अबू आझमी यांची राज ठाकरेंवर टीका करण्याची औकात नाही. त्यांचे जे कान गरम झाले होते ते विसरले असतील. आता पुन्हा तसेच करण्याची वेळ आली आहे का? राजकीय टीका करायची असेल तर नक्कीच करा. पण वैयक्तित पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केला, आमच्या नेत्यांवर वैयक्तित टीका केली तर महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने नक्की उत्तर दिलं जाणार," असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.