मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनीराज ठाकरे यांचा मुन्नाभाई असा उल्लेख केला.
काही दिवसांपूर्वी मला एका शिवसैनिकाचा फोन आला. तो मला विचारत होता, साहेब तुम्ही लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं, त्याचा काय संबंध? तर तो म्हणाला, त्या चित्रपटात संजय दत्तला सगळीकडे गांधीजी दिसत होते. आपणच गांधीजी झाल्यासारखं त्याला वाटत होतं. हल्ली असाच एक मुन्नाभाई फिरतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर म्हणाले की, लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात महात्मा गांधींचे विचार वाचून चित्रपटाचा नायक ते आत्मसात करतो, त्याप्रमाणे राज ठाकरेही लहानपणापासून बाळासाहेबांचे विचार आत्मसात करताय. उद्धव ठाकरेंना मात्र बाळासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याची टीका अमेय खोपकर यांनी केली.
उद्धव ठाकरेंनाचा बाळासाहेब समजले नाहीत. तसेच लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपत देखील त्यांना समजलेला नाही. त्यामुळे तो नीट समजून घ्यावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना चित्रपटाची डीव्हीडी पाठवणार असल्याची माहिती अमेय खोपकर यांनी दिली.
दरम्यान, सध्या एकजण भगवी शाल पांघरून फिरतोय. आपणच बाळासाहेब असं त्याला वाटू लागलंय. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. तसंच यांचंही झालंय. त्यामुळे यांना फिरू द्या. कधी ते मराठीचा मुद्दा घेऊन फिरतील. कधी हिंदूंचा मुद्दा घेऊन येतील. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी काढला होता.
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वेगळं नातं- प्रकाश महाजन
मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळालं. मुन्नाभाई गांधींजीचा अभ्यास करतो म्हणून त्याला गांधी दिसले. बाळासाहेबांना जाऊन इतके वर्ष झाली तरी तुम्ही कधी त्यांना दिसल्याचं बोलला नाही. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वेगळं नातं होतं. आज पुत्रप्रेमाचा डंका ते वाजवत आहेत. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे दिसत असतील तर केमिकल लोचा कसा? असं त्यांनी सांगितले.