मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे अमित ठाकरे यांनी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सगळ्या रुग्णालयांना जोडून एक अॅप तयार करण्याची मागणी केली होती. मात्र आता पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्नाबाबत अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली आहे. एमपीएससी समनव्य समिती महाराष्ट्र राज्य यांनी ट्विट करुन यासंबंधित माहिती दिली आहे.
एमपीएससी समनव्य समितीने महाराष्ट्र राज्यानं ट्विट केले आहे की, अमित ठाकरे यांनी आमच्याशी फोन वरून चर्चा करून आमची विचारपूस केली. यानंतर उद्धव ठाकरे यांना फोन करुन बसेसची सोय करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात यावे अशी विनंती केली. उद्धव ठाकरेंनी देखील येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे, अशी माहिती एमपीएससी समनव्य समितीने दिली आहे.
अमित ठाकरे यांनी याआधी उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र लिहिलं होतं. यामध्ये सध्याच्या युगात बहुतांश लोकांकडे अँड्रॉइड मोबाइल आहेत, त्यामुळे आपण जर माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सगळ्या रुग्णालयांना जोडून एक APP तयार केला आणि त्यामध्ये असलेल्या कोविड 19 आणि अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची माहिती तसेच तिथे उपलब्ध असणाऱ्या बेड्सची माहिती रोजच्या रोज अपडेट केली तर लोकांना ही माहिती मिळणं सोपं जाईल. यामुळे सामान्य लोकांना नाहक होणारा त्रास होणार नाही, असं अमित ठाकरेंनी या पत्रात म्हटलं होतं.