Join us

'महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली, तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…'; अमित ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 8:16 PM

मनसे नेते व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे.

मुंबई: चर्नीरोड येथील एका वसतिगृहाच्या खोलीत १८ वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. सुरक्षा रक्षकानेच तरुणीवर बलात्कार करत तिची गळा दाबून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हत्येनंतर सुरक्षा रक्षकाने लोकल समोर येत आयुष्य संपविले आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया विरुद्ध हत्येसह बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

मूळची अकोला येथील रहिवासी असलेली १८ वर्ष २ महिन्याची तरुणी सावित्रीबाई फुले वसतीगृहात राहण्यास होती. तिचे वडील पत्रकार आहे. ती वांद्रे येथील एका नामांकित कॉलेज मध्ये पॉलिटेक्निकलच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत सापडला. या घटनेने वसतीगृहात एकच खळबळ उडाली. 

सदर घटनेवरुन राज्यभरात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. याचदरम्यान मनसे नेते व मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे. ज्या सावित्रीमाईंमुळे भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ झाली, त्यांच्याच नावाच्या हॉस्टेलमध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार-खून झाल्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, आज हजारो तरुणी आपल्या शहर-गावापासून दूर मुंबई-पुण्यासारख्या शहरात शिक्षण-नोकरीसाठी हॉस्टेलमध्ये राहत आहेत. कालच्या दुर्दैवी घटनेमुळे अशा तरुणींच्या आईवडिलांची काय घुसमट होत असेल, याची कल्पना करवत नाही. राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी आता तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगांभीर्याने घ्यावा आणि राज्यातील सर्व महिला हॉस्टेल्सचे 'सिक्युरिटी ऑडिट' करावे, अशी मागणी देखील अमित ठाकरेंनी केली आहे. 

तरुणी मूळची अकोला येथील रहिवासी असून दोन ते तीन दिवसांत गावी जाणार होती. तसे तिकीट काढले असल्याची माहिती मिळत आहे.  अशी आली घटना उघडकीस अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी वसतीगृहात राहणाऱ्या तरुणीचा दरवाजा लॉक असून मुलगी कुठे आहे याबाबत काहीही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, खोलीतच मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आला. तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसतिगृहातील संशयास्पद व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :अमित ठाकरेमुंबईपोलिसमहाराष्ट्र सरकार