Join us

मुंबईत अमित ठाकरेंचा झंझावात; तब्बल १४ महाविद्यालयात 'मनविसे'ची स्थापना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 5:06 PM

या सर्वच महाविद्यालयांत अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी तसंच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी आज मुंबईतील विविध महाविद्यालयांत मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलक अनावरण केले. अमित ठाकरे यांनी मनविसेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनसेच्या तरुण फळीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. गेल्या दोन महिन्यात अमित ठाकरे यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात आणि त्यानंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि मनविसेत अनेक नवीन चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी दिली. 

१ ऑगस्ट हा मनविसेचा १६वा वर्धापन दिन असल्याच्या निमित्ताने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान मनविसे युनिट उदघाटन सप्ताह राबवण्यात येत आहे.  स्वतः अमित ठाकरे यांनी आज सिद्धार्थ महाविद्यालय - आनंद भवन आणि बुद्धभवन, भवन्स महाविद्यालय, लाला लजपतराय महाविद्यालय, कीर्ति महाविद्यालय, रुपारेल महाविद्यालय, रुईया महाविद्यालय, पोदार महाविद्यालय, आचार्य महाविद्यालय, नारायण गुरू महाविद्यालय, पुणे विद्यार्थी गृह महाविद्यालय, डी ए व्ही महाविद्यालय, श्री राम महाविद्यालय, केळकर वझे महाविद्यालय या १४ महाविद्यालयांना भेट दिली आणि युनिट फलक अनावरण केले. 

या सर्वच महाविद्यालयांत अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी तसंच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक महाविद्यालयांत अमित ठाकरे यांनी मुख्याध्यापक तसंच विश्वस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मनविसेचे यापूर्वीचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मनविसेची जबाबदारी अमित ठाकरेंच्या खांद्यावर पडली. अलीकडच्या काळात अमित ठाकरेंनी महासंपर्क अभियान हाती घेतले आणि राज्यभरात विविध ठिकाणी तरुणांशी संवाद साधला. 

मनसे राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे. गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले आहेत. आता मात्र यापुढे आपल्याला फक्त विजय बघायचा आहे. आता राजकीय चढ-उतार नको, फक्त चढ हवा, असं अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं होतं.  

टॅग्स :अमित ठाकरेमनसे