फी वाढीविरोधात मनसे नेते अमित ठाकरेंचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 10:41 AM2020-07-07T10:41:57+5:302020-07-07T10:45:41+5:30
आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा" अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबई – कोरोना संकटकाळात शाळांनी फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने ८ मे रोजी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यात पालकांना फी मासिक, त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा, फी वाढ करु नये, शक्य झाल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करुन योग्य प्रमाणात फी कमी करावी, पण या सरकारी आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. शासनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे याबद्दल मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे.
या पत्रात अमित ठाकरेंनी नमूद केले आहे की, कोरोना संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या- आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात. दुर्दैवाने, काही शाळा अपेक्षित समंजसपणा दाखवत नसून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत. गेल्या आठवड्यात अशाच स्वरूपाच्या तक्रारी घेऊन काही पालक मला भेटूनही गेले. पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसंच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, यासंदर्भात आपण स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा" अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तसेत काही शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं जाईल, ज्या पालकांकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांना प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन शाळेची फी भरा असं सांगण्यात येत आहे. हा सगळा प्रकार संतापजनक असून पालकांवर अन्याय करणारा आहे. गेल्या काही दिवसांत मनसेकडे अशा अनेक पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. ८ मेच्या निर्णयाविरोधात खासगी शाळा उच्च न्यायालयात गेल्यावर राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. या पुढच्या सुनावणीत पालकांच्या बाजूने राज्य सरकारने ठामपणे उभे राहण्याची भूमिका घ्यावी असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, जोपर्यंत या प्रकरणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत तरी शाळांनी फी वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नये, या दृष्टीने शासनाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. फी भरण्यासाठी पालकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये, सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.