Join us

अमित ठाकरे करणार मनविसेत संघटनात्मक बदल; मागच्या फळीतल्या तरुण नेतृत्वाला आणणार पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 9:56 AM

नवीन चेहऱ्यांनाही संधी देणार?

मुंबई- गेल्या ७ दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुंबईतील १५ विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांत मनविसेचे पदाधिकारी आणि कॉलेजमधील नवीन तरुण तरुणींना प्रत्यक्ष भेटत आहेत, त्यांच्याशी थेट बोलत आहेत. या १५ विधानसभेतील मनविसेच्या १५ विभाग अध्यक्षपैकी किमान १० विभाग अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची चर्चा मनसे वर्तुळात सुरू आहे. 

संघटनेतील मागच्या फळीतील काही जणांना ते पुढच्या फळीत आणणार असून काही नवीन चेहऱ्यांना विभाग अध्यक्षपदी काम करण्याची संधी अमित ठाकरे देण्याची दाट शक्यता आहे. तर, जुन्या विभाग अध्यक्षपैकी निवडक जणांना वरिष्ठ पदावर बढती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं.

तरुणांचा पक्ष ही मनसेची ओळख आहे. त्यामुळे मनसेच्या विद्यार्थी सेनेचं पक्षांतर्गत महत्त्व खूप असून आता अमित ठाकरेच मनविसेचे अध्यक्ष असल्यामुळे या बदलांचे राजकीय महत्त्व मोठे आहे.  शिवडी, वरळी, कुलाबा, मलबार हिल, माहीम, वडाळा, मानखुर्द, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी, मुलुंड, भांडूप, धारावी, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम विभागातील  मनविसेच्या विभाग अध्यक्षांना बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

दरम्यान, अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रत्येक विभागात तरूणांची गर्दी होत अनेकजण मनविसेत सक्रिय काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनविसेच्या या मोर्चेबांधणीमुळे आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या वातावरण निर्मितीमुळे अमित ठाकरेंचे मिशन मुंबई सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान असले तरी प्रत्यक्षात मुंबई महापालिका निवडणुकीची अप्रत्यक्ष तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. अमित ठाकरे जातात तिथे मनसे पदाधिकाऱ्यांचे बॅनर्स, मनसेचे झेंडे, ढोल ताशा पथकं यांतून मनसेची जोरदार वातावरण निर्मिती सुरू आहे.

किती वेळ चालते अमित ठाकरेंची संवाद बैठक ?

प्रत्येक विभागात अमित ठाकरे विद्यार्थी विद्यार्थिनीशी किमान दीड ते दोन तास संवाद साधतात. व्यक्तिशः आणि गटागटाने विद्यार्थी अमित यांना भेटतात बोलतात. मनविसेच्या जुन्या तसंच विद्यमान पदाधिकाऱ्यांशीही अमित बोलतात. मनविसे पदाधिकारी त्यांचा कार्य अहवाल अमित यांना सादर करतात.

विद्यार्थी अमित ठाकरेंना काय सांगतात?

झोपडपट्टी तसंच बैठ्या चाळींमध्ये राहणारे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या शैक्षणिक समस्या सांगत आहेत. महाविद्यालय फी परवडत नसल्याचे तसंच प्रवेश मिळवताना येणाऱ्या अडचणी यांबाबत ते बोलत आहेत.  मनविसेत सक्रिय काम करण्याची इच्छा हजारो तरुण अमित ठाकरेंशी संवाद साधल्यानंतर व्यक्त करत आहेत. पदाधिकारी बनण्यासाठी प्रत्येकजण फॉर्म भरत आहे.

टॅग्स :अमित ठाकरेमनसेराज ठाकरे