मनसे विभाग अध्यक्षावर आधी विनयभंगाचा गुन्हा, नंतर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:57 AM2018-11-05T05:57:02+5:302018-11-05T05:58:07+5:30
मनसेचे चेंबूर येथील विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळे यांच्याविरुद्ध ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई - मनसेचे चेंबूर येथील विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळे यांच्याविरुद्ध ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, काही तासांतच चौकडीने चुनाभट्टी परिसरात त्यांची गाडी अडविली आणि त्यांना बंदुकीच्या धाक दाखवत हत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर दुनबळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चुनाभट्टी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीसानुसार, चेंबूर रेल्वे स्थानक परिसरात एका ३२ वर्षीय महिलेसोबत दुनबळे यांनी असभ्य वर्तन केले. महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध चेंबूर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
याच दरम्यान रात्री १०च्या सुमारास दुनबळे चुनाभट्टी येथील त्यांच्या घराकडे जात असताना, चौघांनी त्यांची गाडी अडविली. बंदूक, चाकूच्या धाकात त्यांना बेदम मारहाण केली. घटनेची वर्दी लागताच, पोलिसांनी त्यांना सायन रुग्णालयात दाखल केले. तेथून रविवारी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी चौघांना अटक केली.
हा हल्ला एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय कर्ण दुनबळे यांनी पोलिसांकडे व्यक्त केला.
बंदूक, चाकूचा धाक
रात्री १० च्या सुमारास दुनबळे चुनाभट्टी येथील त्यांच्या घराकडे जात असताना चौघांनी त्यांची गाडी अडविली. बंदूक, चाकूच्या धाकात त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी रवींद्र गायकवाड (३२), सतीश आठवले (२९), गोपाळ नाडर (२७), आसीफ शेख (३०) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का? या दिशेने तपास सुरू आहे.