हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच; भोंगे बंद झालेच पाहिजे, शेवटचा १ दिवस, अविनाश जाधव यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:34 PM2022-05-03T16:34:24+5:302022-05-03T16:34:58+5:30
राज्यभरात मनसैनिक लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यासाठी सज्ज झाले आहे.
मुंबई- ३ मे रोजी ईद आहे. त्या सणाला गालबोट लावायचं नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदींवर भोंगे असतील, त्या त्या ठिकाणी लाऊड स्पीकरवर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. यांना विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी थेट इशारा दिला आहे.
राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर राज्यभरात मनसैनिक लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यासाठी सज्ज झाले आहे. मनसेचे नेते आणि ठाणे- पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उद्या हनुमान चालीसा लावण्यावर ठाम आहेत. हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच...भोंगे बंद झालेच पाहिजे, शेवटचा १ दिवस...अशी फेसबुक पोस्ट अविनाश जाधव यांनी केली आहे.
राज ठाकरेंच्या आणि मनसैनिकांच्या भूमिकेनंतर पोलिसांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेत जर कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ३० हजार होमगार्ड राज्यात तैनात केले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या ७ तुकड्याही तैनात आहेत. राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक एकोप्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका घेण्यात येत आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रातील जनतेने शांतता सुव्यवस्था राखावी असं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केली आहे. समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असंही महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनी नोटीस दिलीय. त्याचे स्वागत आहे. कायद्याचे पालन राखणारे आम्ही आहोत. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले आहे. त्यांचा मानसन्मान राखायला हवा. ईद हा मुस्लीम बांधवांचा सण आहे. आमचं त्याला काहीच म्हणणं नाही. बाळा नांदगावकरमुळे समाजाला त्रास होत असेल तर माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे. कायदा मोडणाऱ्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी असं मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.