मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच 23 जानेवारीला होणाऱ्या मनसेच्या अधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंचं अधिकृत लॉन्चिंग होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसेला तरुण चेहरा देण्यासाठी अमित ठाकरे राजकारणात सक्रिय होतील, असं सांगण्यात येत आहे. अमित ठाकरे राजकारणात पदार्पण होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आईचा हळवेपणा आणि वडीलांकडून वारशात मिळालेला निर्णायक क्षणी आवश्यक असलेला संयम आणि करारीपणा याचा संयोग म्हणजे अमित ठाकरे असल्याचे सांगत मनसेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या ठाण्यातील प्रचारसभेवेळी किस्सा सांगितला आहे.
अविनाश जाधव यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राजसाहेबांची ठाण्याला सभा जाहीर झाली आणि महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह नेहमीप्रमाणे रस्त्यारस्त्यावर नाक्यानाक्यावर दिसायला लागला. ठाण्यात लगबग सुरू झाली. रस्ता निवडला गेला. परवानग्या आणल्या गेल्या. बर्याच वर्षांनी गडकरीसमोरचा रस्तासुद्धा "हाऊसफुल" चा आनंद घेणार म्हणुन गडकरी रंगायतन विद्युत रोशनाईने न्हाऊन निघाल. अशातच नेहमीप्रमाणे सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच सरकारच्या इशार्यावरून पोलिसांची इंट्री झाली आणि सगळा नुरच पालटला.
तुम्हाला इथे साहेबांची सभा करता येणार नाही असं ठाणे शहरचे एसीपी ठासुन सांगत होते. साहेब पण सगळ्या परवानग्या घेतल्यानंतर आयत्यावेळी हे अस थांबवणे योग्य आहे का..? पदाधिकारीही आर्जव करत होते. पण पोलिस काही ऐकायला तयार नव्हते. हे बघा, आमच्याकडे काही ईनपुट्स आले आहेत त्यामुळे आम्ही आता परवानगी नाकारत आहोत. तरीही तुम्ही सभा घेणार असाल तर नाईलाज होईल आमचा गुन्हे नोंदवावे लागतील असा पोलिसांनी निर्वाणीचा ईशारा दिला. कार्यकर्त्यांमद्धे कुजबूज सुरू झाली आता कस करायच.? सभा तर झाली पाहीजे. अरे कोणितरी बोला, पण पिन ड्रॉप सायलेंस. काही दिवसांपुर्वीच पदाधिकारी अनधिकृत फेरीवाला हटाव आंदोलनात तुरूंगवास भोगुन बाहेर आले होते. परत अंगावर केस घेण्याची कोणाचीच मानसिकता नव्हती. कार्यकर्ते मात्र इरेला पेटले होते. तरीही पदाधिकार्यांनी ठासुन सांगितले. सभा ईथेच होणार जे करायच आहे ते करा. पोलिसांनी आता पथके बोलवायची तयारी चालवली होती. ठिणगी पडली होती.
अस असेल तर माझ्यावर गुन्हे नोंदवा, मी तयार आहे. पण सभा ईथेच होणार रंगायतन समोरच्या गर्दीतुन आवाज आला म्हणुन सगळ्यांनी मागे बघितले. हिंदी चित्रपटातील नायकांना लाजवेल असं देखणं व्यक्तिमत्व बघुन आधी पोलिसांना वाटलं, कोणितरी गडकरी रंगायतन मधुन नाटकाचा प्रयोग संपवुन आला असावा. पण कार्यकर्त्यांनी त्या तरूणाला रस्ता दिल्यावर पोलिसांना कळल हा कोणीतरी मोठा पदाधिकारी असणार.
साहेब, तुम्ही खरच गुन्हा नोंदवा माझ्यावर.. महाराष्ट्रालाही कळू दे सरकार पोलिसांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी कस करतं ते...आता पोलिसांमद्धे कुजबूज सुरू झाली. एक कॉन्स्टेबल एसीपींच्या कानात पुटुपटला साहेब, ते अमित राज ठाकरे आहेत. साहेबांचे सुपुत्र... वडिलांप्रमाणेच असणार. जिद्दी..चला निघुया... नंतर बघु काय ते...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 23 तारखेच्या महामेळाव्यात अमित ठाकरेंच राजकारणात पदार्पण होणार हि बातमी झळकली आणि २ वर्षांपुर्वीचा हा प्रसंग डोळ्यासमोरून गेला. त्यानंतर अनेक वेळा अमित ठाकरेंना भेटलो. आईचा हळवेपणा आणि वडीलांकडून वारशात मिळालेला निर्णायक क्षणी आवश्यक असलेला संयम आणि करारीपणा याचा संयोग म्हणजे अमित ठाकरे. आज मनसेच्या अगदी गावातल्या कार्यकर्त्याकडेही अमित ठाकरेंचा मोबाईल नंबर आहे.. आणि तो स्वतः अमित ठाकरेंनीच त्यांना दिला आहे हे जास्त महत्वाच आहे.. आज तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी जितकी अमित ठाकरेंची नाळ जुळलेली तितकी कदाचितच मनसेच्या दुसर्या कोणत्या नेत्याची जुळलेली असेल असं म्हणत मनसेला भविष्य आहे का विचारणार्यांना मी इतकच सांगेन, अमित ठाकरे हे मनसेच भविष्य असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
'राज'पुत्र सक्रिय राजकारणात?; बाळासाहेबांच्या जयंतीला अमित ठाकरेंचा होणार 'उदय'