भांडूप येथील हॉस्पीटलला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन मनसेने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "सरकार स्थिर आहे की नाही यात जनतेला अजिबात रस नाही, जनतेचे हाल, गैरसोय, मृत्यू कधी थांबणार हे जनतेला जास्त महत्वाचे आहे", असं म्हणत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी भांडूप येथील दुर्घटनेबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी मस्तवाल सरकार आणि जनता बेहाल असं म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?"भांडुप येथील हॉस्पिटलमधील आगीत परत एकदा निष्पाप ११ जणांचे बळी गेले. आज तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. जानेवारीत सुद्धा अशाच जळीतकांडात भंडाऱ्यात अनेक निष्पाप बालकांचे जीव गेले. इथे वरचेवर अशा घटना घडत असतात व काही काळाने आपण विसरून जातो कारण या घटनेत कोणा "VIP" चा जीव नाही गेला, प्राण गमावलेले सर्व हे सामान्य होते. सत्ता हि जनतेच्या भल्यासाठी राबवायला हवी परंतु हे न होता सत्तेची मस्ती ही पावलोपावली दिसत आहे. सरकार या गोष्टी अतिशय हलक्यात घेत आहे व याबद्दल ठोस पाऊले उचलून पुनरावृत्ती न थांबवता येऊन जाऊन आमचे सरकार स्थिर आहे हा बाईट पाहण्यात येतो. सरकार स्थिर आहे की नाही यात जनतेला अजिबात रस नाही, जनतेचे हाल, गैरसोय, मृत्यू कधी थांबणार हे जनतेला जास्त महत्त्वाचे आहे", असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे. सत्तेच्या मस्तीत हे सरकार एवढे धुंद झाल्याने जनता मात्र बेहार झाली आहे, असंही नांदगावकरांनी नमूद केलं आहे.