मुंबई- अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला पत्राद्वारे ही पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी भाजपला पत्र लिहिणे हा स्क्रिप्टचा एक भाग होता. भाजपला पराभव दिसत असल्यानेच माघार घेतल्याची टीका संजय राऊत यांनी केली. यावर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.
"राऊतजी आपणांस सगळेच जण ओळखून आहेत, आपली तीच ओळख चांगली आहे. आजपर्यंत मी तुमच्या कोणत्याच टीकेला उत्तर दिलेले नाही. पण आजही तुम्ही राज साहेबांबद्दल गरळ ओकली. तुमच्या जडणघडणीत राज साहेबांची तुम्हाला खूप मोठी मदत झालेली आहे, हे तुम्ही विसरले आहात, असं प्रत्युत्तर बाळा नांदगावर यांनी संजय राऊत यांना दिले.
"तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे. "एहसान फरामोश" म्हणून तुमची ओळख होऊ नव्हे हीच सदिच्छा. म्हणून इथून पुढे तरी टिका करताना भान ठेवा, असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी लगावला.
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली असून, आताच्या घडीला संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात आहेत. जामीन अर्जावरील सुनावणीवेळी संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना राज ठाकरे आणि भाजपवर हल्लाबोल केला होता.