मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Published: January 9, 2021 02:37 PM2021-01-09T14:37:42+5:302021-01-09T14:38:13+5:30

'जिथे भेळ तिथे खेळ' अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो, असं बाळा नांदगांवकर यांनी सांगितले. 

MNS leader Bala Nandgaonkar has criticized Shiv Sena leader Vasant Geete | मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले...

मनसेच्या 3 नेत्यांवर आरोप करणाऱ्या वसंत गीतेंना बाळा नांदगांवकरांनी सुनावलं; म्हणाले...

googlenewsNext

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, आपला पक्ष बळकट करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सर्वस्व पणाला लावताना दिसत आहेत. याचदरम्यान मनसेचे पूर्वाश्रमीचे नेते आणि नुकतेच भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आलेले वसंत गीते मनसेत पुन्हा प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र वसंत गीते यांनी मनसेच्या तीन मोठ्या नेत्यांवर आरोप करत मनसेप्रवेशाचे वृत्त फेटाळले होते. 

मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वसंत गिते यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षात परतण्याचं सूचवलं होतं. मात्र, मला ज्या तीन नेत्यांमुळे मनसेतून बाहेर पडावं लागलं, त्या नेत्यांसोबत काम करावं का? असा प्रश्न गिते यांनी विचारला. गिते यांचा रोख पूर्णपणे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याकडेच होता. नाशिकमध्ये मनसेला आपण वाढवलं, पक्षाचं काम मोठं केल. पण, भविष्यात आपल्याला स्पर्धक निर्माण होईल, म्हणून काही जणांनी मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडलं, असे यावेळी गिते यांनी म्हटलं होतं. 

वसंत गीतेच्या या वक्तव्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी देखील फेसबुकद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. "खाऊ तिथे आम्ही जाऊ", असं म्हणत बाळा नांदगांवकर म्हणाले की,  2 दिवसांपूर्वी नाशिक येथील काही "अतिशय मोठे" नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच "मोठे नेते" आहेत ज्यांनी मनसे ची चलती असतांना सेना सोडली, भाजपाची सत्ता असतांना मनसे सोडली, सेनेची सत्ता असताना परत भाजपा सोडली.  एवढ्या "निष्ठावंत" नेत्यांवर काय बोलणार. यांचे 'जिथे भेळ तिथे खेळ' अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो, असं बाळा नांदगांवकर यांनी सांगितले. 

शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायम च टाळत आलो, परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाही म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते. त्यांना खुप शुभेच्छा व एकच मैत्रीपूर्ण सल्ला 'आता तरी गेल्या घरी सुखी राहा', असा टोलाही बाळा नांदगांवकर यांनी लगावला आहे. 


"खाऊ तिथे आम्ही जाऊ"

2 दिवसांपूर्वी नाशिक येथील काही "अतिशय मोठे" नेते बोलले कि नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे...

Posted by Bala Nandgaonkar on Friday, 8 January 2021

दरम्यान,  कृष्णकुंजवरील बैठकांचे सत्र आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेली विविध आंदोलने या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मंगळवारी मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. आपापल्या भागातील राजकीय स्थिती मांडण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, त्यासाठी पक्ष संघटनेची सद्य:स्थिती, तयारी, राजकीय-सामाजिक समीकरणे आदींबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. शिवाय, आगामी काळात स्थानिक कार्यकर्त्यांना पदे आणि जबाबदाऱ्या देण्याबाबतही चाचपणी सुरू आहे.

Web Title: MNS leader Bala Nandgaonkar has criticized Shiv Sena leader Vasant Geete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.