मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लागोपाठ घेतलेल्या सभा, मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेली ठाम भूमिका, हनुमान चालिसा लावण्याचे केलेले आवाहन आणि जाहीर केलेला अयोध्या दौरा या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांना धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली होती. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेटही घेतली होती. यानंतर आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतला आहे.
राज ठाकरेंना आधीच वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवली असून, फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर अखेर राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज मी जेव्हा राज ठाकरेंच्या घरी गेलो तेव्हा एक इन्सेक्टर आणि एक पोलीस दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरु आहे. सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
तुम्ही सरकार म्हणून शपथ घेतात तेव्हा द्वेष करणार नाही, समानतेची वागणूक देऊ अशी शपथ घेतात. ज्यांना गरज नाही त्यांना प्रचंड सुरक्षा देवून ठेवली आहे. ज्यांना गरज आहे त्यांनाच का सुरक्षा दिली जात नाही?, असा सवालही बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली, तसेच भोंग्यबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या मिळत आहेत अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.