मुंबई- सध्या राज्यासाठी ४ हजार मेगावॅट विजेची कमतरता भासत आहे. ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरेसा पुरवठा होत नाही. कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईचा फटका वीजनिर्मितीवर होत आहे. राज्यातील कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांना पुरेसा इंधनपुरवठा होत नसल्यामुळे वीज उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे.
देशातील १० प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने इतर राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन केल्या जात आहे. याचपार्श्वभूमिवर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. IPL साठी प्रकाश फुल, आणि सामान्य जनतेसाठी लाईट गुल, असं म्हणत सरकारने फायदा बघून निर्णय न घेता सामन्य जनतेला केंद्रबिंदू मानून निर्णय घ्यावे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
दरम्यान, विजेची पुरेशी उपलब्धता व भार व्यवस्थापनाद्वारे कोणत्याही परिस्थितीत विजेचे भारनियमन करावे लागणार नाही यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काळातसुद्धा ही परिस्थिती कायम असावी यासाठी महावितरण प्रयत्नांची परिकाष्टा करीत अहे. तसेच भारव्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यालय व जिल्हा स्तरावर स्थापन केलेल्या वॉर रूममधून आढावा घेतला जात असून महावितरणच्या या प्रयत्नांना ग्राहकांनीही विजेचा अपव्यय टाळून आवश्यक्क्यतेनुसारच विजेचा वापर करून, सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील चार दिवसांत कोणतेही भारनियमन नाही-
मागील चार दिवसांत राज्यातील कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. सर्वच वर्गवारीतील फिडरवर महावितरणने अखंडित वीजपुरवठा करून वाढत्या तापमानात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. मागील आठवड्याभरात अदानी पॉवरने आपली उपलब्धता १७०० मेगावॅटवरुन ३०११ मेगावॅट, महानिर्मितीने ६८०० मेगावॅट वरुन ७५०० मेगावॅट याशिवाय एनटीपीसीने ४८०० मेगावॅटवरून ५२०० मेगावॅट पर्यंत विजेची उपलब्धता वाढविलेली आहे, याशिवाय महावितरणच्या सततच्या पाठपुराव्यामुळे साई वर्धा प्रकल्पातील वीज उत्पादन १४० मेगावॅटवरुन २४० मेगावॅटपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे.
सोबतच सीजीपीएलकडून करारीत ७६० मेगावॅटपैकी उर्वरित १३० मेगावॅट वीज पुरवठा २४ एप्रिलपासून सुरु झालेला आहे. तर एनटीपीसीच्या मौदा वीजनिर्मिती प्रकल्पातील बंद असलेला संच २५ एप्रिलपासून कार्यान्वित झाला आहे, त्यामधून २५० मेगावॅट इतका वीजपुरवठा सुरु झाला आहे. या सर्व नियोजनासोबतच, कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करून व गरजेनुसार पावर एक्सचेंजमधून उपलब्ध असलेल्या दराने वीजखरेदी करून महावितरणद्वारे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे व यामुळे आज राज्यात कुठेही भारनियमन करण्यात आलेले नाही.