मुंबई-
मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर सुरू आहे. यात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही इशारा दिला आहे. शिवसेनेचं नेतृत्व ज्यांच्या हातात दिलं गेलं त्या नेतृत्त्वानं पक्षाची आज काय अवस्था केलीय ते आपण सर्वच पाहत आहेत. त्यामुळे मी आज ठामपणे सांगू शकतो की राज ठाकरेंच्या हाती नेतृत्व असतं तर आज महाराष्ट्रात वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
बाळा नांदगावकरांनी यावेळी शिंदे सरकारच्या 'गतीमान महाराष्ट्र' जाहिरातीवरही भाष्य केलं. "सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे. वेगवान निर्णय आणि गतीमान महाराष्ट्र अशी जाहिरात सुरूय. मी त्यांना एकच सांगू इच्छितो की फडणवीस साहेब तुम्हाला पहाटे पहाटे अजित पवारांनी उजवा डोळा मारला होता. आता अजित पवार विरोधी पक्षात असले तरी ते काय करू शकतात याची कल्पना तुम्हाला आहे. शिंदे-फडणवीस प्रचंड निर्णय घेत आहेत याचा आम्हाला आनंदच आहे. पण एक विनंती आहे. जी काय माणसं तुम्हाला फोडायची असतील ती फोडा. पण मनसेच्या माणसांना फोडायचं पाप तुम्ही करू नका. कारण हे वागणं बरं नव्हं. सुरेखा पुणेकरांची एक लावणी आहे. कारभारी दमानं...होऊ द्या दमानं...पण लक्षात ठेवा. तुम्ही दमानं बोलाल पण इथं टायगर जोमानं येणारय", असं बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्षमुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात थोड्याच वेळात 'मनसे'च्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी गुढीपाडवा मेळावा खूप महत्वाचा मानला जातो. राज ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार आणि राज्याच्या राजकारणावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी शिवाजी पार्क मैदानात भव्य व्यवस्था करण्यात आली आहे.