"झोपी गेलेला जागा झाला..!", मनसेचा आदित्य ठाकरे अन् वरुण सरदेसाई यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 04:57 PM2022-08-07T16:57:51+5:302022-08-07T16:59:16+5:30
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे निष्ठायात्रेवर आहेत.
मुंबई-
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे निष्ठायात्रेवर आहेत. तर दुसरीकडे सध्याच्या राजकीय घडामोडींपासून दूर राहात मनसेचे नेते अमित ठाकरे महाविद्यालयीन पातळीवर तरुणाईची भेट घेत मनसेच्या विद्यार्थी सेनेला बळकटी देण्याचं काम करत आहेत. मुंबईतील ३० महाविद्यालयांमध्ये मनसेच्या विद्यार्थी संघटनेचं युनिट अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. हे पाहून आता युवासेना देखील अधिक सक्रिय झाल्याचा टोला मनसेनं लगावला आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि नेते वरुण सरदेसाई यांच्यावर टीका केली आहे.
"मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबईतील ३० महाविद्यालयांत मनविसे युनिट उदघाटन झाल्यानंतर- शिवसैनिकांच्या निष्ठा तपासण्यासाठी रक्त तपासणी करणारे- pathologist श्री. आदित्य ठाकरे जागे झाले आहेत. पश्चिम उपनगरातील पाटकर किंवा निर्मल, गोखले महाविद्यालयांत आता शिवसेनेचा, युवासेनेचा बोर्ड लावून काहीही फायदा होणार नाही, हे त्यांना कुणीतरी सांगायला हवं. या महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनं अमितसाहेबांनी कधीच जिंकली आहेत", असं कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
वरुण सरदेसाई यांनाही कीर्तिकुमार शिंदे यांनी टोला लगावला आहे. "वरून' आलेल्या सरदेसाईच्या माहितीसाठी, मनविसेची मुंबईतील १०० महाविद्यालय युनिट्स सज्ज आहेत. अक्षरशः हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनविसेत सक्रिय काम करण्यासाठी अर्ज भरले आहेत. आज चांदिवलीत तीन महाविद्यालयांत आमचा शानदार युनिट उदघाटन सोहळा आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातील 'प्रत्येक महाविद्यालयात मनविसे युनिट' हा उपक्रम अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही राबवत आहोत. अमितसाहेबांच्या मनविसेचा नाद करू नका. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, संभाजीनगर, नागपूर ...मनविसेची युनिट्स सर्वत्र स्थापन होत आहेत!", असं कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.