मुंबई/नांदेड- भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले. पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला नाही, आपल्या शाळेतही संगणक नसल्याचे सांगितले. याबाबत राहुल गांधी यांनी काल त्यांच्या भाषणात देखील उल्लेख केला. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला आज संगणक भेट दिला. यावेळी त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.
राहुल गांधींच्या या कृतीचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय. मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील ट्विट करत राहुल गांधींच्या या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे. गजानन काळे म्हणाले की, सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे स्वप्न बाळगणाऱ्या नांदेडच्या सर्वेश हाटणेला परिस्थितीमुळे कॉम्प्युटर सुध्दा पाहता आला नाही हे लक्षात ठेवून त्याला राहुल गांधी यांनी आज कॉम्प्युटर भेट दिला. राजकारण चालत राहील पण ही संवेदनशीलता कायम अशीच राहो..., असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातल्या प्रत्येक मुलाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वप्न पूर्ण करावे. परंतु भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे लाखो मुले कोरोना काळात संगणक नसल्याने ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. भारत जोडो यात्रा अशा स्वप्नांना मुर्त रुप देण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.