Join us

Uddhav Thackeray: उद्या औरंगाबादचं नामांतर होणार?; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी चर्चांना उधाण, मनसेची मात्र टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 12:04 PM

उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी मनसेने निशाणा साधला आहे.

मुंबई/औरंगाबाद- राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी ८ जून रोजी औरंगाबादेत सभा होत आहे. त्यासाठी शिवसेनेकडून गेल्या एक महिन्यापासून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर 'होय संभाजीनगरच...' असा उल्लेख करण्यात आला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेकडून आतापर्यंत अनेक टीझर जारी करण्यात आले आहेत. त्यातच आता सभेच्या एक दिवस आधी सुद्धा आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराची केलेली मागणीचा भाषण दाखवण्यात आला आहे. सोबतच, लाखोचा भगवा गजर, आपलं संभाजीनगर...सिंहगर्जना घुमणार खरे हिंदुत्व काय? हे संभाजीनगर सांगणार, भगवी पताका फडकणार..असं टीझरमध्ये म्हटलं आहे.

होय 'संभाजीनगरच'... उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेनेनं पुन्हा ठणकावून सांगितलं

उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी मनसेने निशाणा साधला आहे. होय..संभाजीनगर असे म्हणत बॅनरबाजी करायची..मी संभाजीनगर म्हणतोय ना असं सभेत म्हणायचं ,एवढं करून झालं का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय?, असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?, असा सवाल उपस्थित करत भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आल्यावर अवघड वाटतंय सगळं, असा टोलाही गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेत बोलताना औरंगाबादच्या नामांतराची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर असे म्हटले होते. त्यानंतर, आता शिवसेनेकडून बुधवार ८ जून रोजीच्या सभेसाठी होय संभाजीनगरच... असे म्हणत बॅनरबाजी केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा बॅनर झळकवण्यात आला असून त्यावर उद्धव ठाकरेंचा फोटोही आहे. त्यामुळे, औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उद्याच्या सभेत निघणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

नामांतरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड

मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा मुद्दा सध्या जोर धरत आहे. दरम्यान, या शहरांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नसून, काहीजण हवेत बाता मारत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. 'लोकमत'शी बोलताना कराड यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेऔरंगाबादमनसेशिवसेना