'...तेव्हा नाक घासत शिवतीर्थावर आले होते'; गजानन काळे यांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:48 PM2023-06-14T18:48:17+5:302023-06-14T18:50:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे बॅनर झळकलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, नेत्या सुप्रिया सुळे, तर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. या भावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश झाला आहे. शिवतीर्थावर राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले.
राज ठाकरेंच्या या बॅनवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. राज ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले. त्यांना शुभेच्छा. आता त्यांच्याकडे एकच आमदार आहे. हा आकडा ५० पर्यंत न्यावा लागेल. राज ठाकरे यांनी कृतीशील कार्य करावे. फक्त लोकांच्या नकला व टोमणे मारणे कमी करावे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आता जितेंद्र आव्हाड यांच्या या टीकेला मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना लवकरच मनसेची ब्लू प्रिंट पाठवणार आहे. चार खासदार असणारे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात आणि आमच्यावर टीका करतात. जितेंद्र आव्हाड पदवीधर निवडणुकीसाठी नाक घासत शिवतीर्थावर पाठिंबा मागण्यासाठी आले होते, अशी टीका गजानन काळे यांनी केली. तसेच कार्यकर्त्यांना घरी आणून मारहाण करणे, ही जितेंद्र आव्हाड यांची अक्कल आहे. त्यामुळे त्यांनी नक्कलवर बोलू नये. ज्यांनी स्वतःच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमावला आहे, ते आमच्यावर बोलत आहेत, असा निशाणा देखील गजानन काळे यांनी जितेंद्र आव्हाडांवर लगावला.
दरम्यान, राज ठाकरे यांचा आज वाढदिवस १४ जून रोजी आहे. यानिमित्ताने शिवतीर्थ परिसरात मनसेने बॅनर लावले आहेत. महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे असे ठळक अक्षरात या बॅनरवर लिहिले आहे. तसेच हिंदू जननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असा मजकूरही या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे यांचाही मोठा फोटो आहे. याशिवाय पदाधिकारी आणि नेत्यांचेही फोटो आहेत. शिवतीर्थावर हे फोटो लागल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.