'शरद पवारांकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत'; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:21 PM2022-07-22T15:21:00+5:302022-07-22T15:21:46+5:30
मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई- महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना गडचिरोलीचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली असताना त्यांची सुरक्षा वाढवण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता, असा दावा करत शिंदे गटात दाखल झालेले आमदार सुहास कांदे यांनी केला होता. सुहास कांदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुहास कांदे यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. गजानन काळे ट्विटरद्वारे म्हणाले की, राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केली. जीवाला धोका असूनही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका म्हणून आदेश...राजकारण वेगळं आणि कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर ती गोष्ट वेगळी. जनाबसेनेच्या "मोठे नवाब" यांनी त्यांचे आदर्श पवारसाहेब यांच्याकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
सन्मा.राजसाहेब ठाकरे यांची सुरक्षा कमी केली.
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 22, 2022
जीवाला धोका असूनही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका म्हणून आदेश.
राजकारण वेगळं आणि कोणाच्या जीवावर बेतणारी गोष्ट असेल तर ती गोष्ट वेगळी. जनाबसेनेच्या "मोठे नवाब"यांनी त्यांचे आदर्श पवारसाहेब यांच्याकडून राजकारणाचे काही धडे गिरवावेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली.
हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे, असे सुहास कांदे म्हणाले होते.