Join us  

'...तर तुमचे प्रमुख कायमचे घरी बसतील'; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 5:08 PM

मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केल्यामुळं भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. तसेच नारायण राणे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याने विनायक राऊतांवर गुन्हा नोंदविण्यात आलाय. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला आहे. जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते, त्यामुळे धक्का बसण्यासारखं काही नाही. मोदीजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल, तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर आम्ही गुन्हेगार आहोत, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

सुषमा अंधारेंच्या या विधानावरुन मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंना जो कायदा लावला जातो, तो जर तुमच्या प्रमुखांना लावला तर तुमचे प्रमुख कायमचे घरी बसतील. काँग्रेस, राष्ट्रवादी असो मविआ असो नाहीतर भाजपा सरकार यांनी राज ठाकरेंवर किती गुन्हे दाखल केलेत याची माहिती घ्या आणि बोला. उद्धव ठाकरेंवर डास मारल्याचाही गुन्हा नाही, अशी टीका गजानन काळे यांनी केली. तसेच अंधारात तिर नका मारू ताई, असा टोलाही गजानन काळे यांनी सुषमा अंधारे यांना लगावला आहे.

दरम्यान, चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाही. चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून जमले. कदाचित ही गर्दी बघून अस्वस्थ होणं. संजय राऊतांचे स्पिरीट आमच्याकडे आहे. ते स्पिरीट घेऊन आम्ही लढणार आहोत. नोटिशीला कायदेशीर उत्तर देऊ. खासदार राजन विचारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, अनिता बिर्जे आणि मी अशा ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?

ठाण्यात झालेल्या महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली होती. या यात्रेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांची गर्दीच साक्ष देते की, आगामी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असतील. काही लोकांनी दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे, असे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता म्हणाल्या. गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटवले, ही घोषणा त्यांनी दिली.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामनसे