"विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय"; मनसेचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 06:54 PM2023-03-10T18:54:39+5:302023-03-10T18:54:57+5:30
मनसेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ठाण्यातील कार्यक्रमात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "हिंदुत्वाला मानता म्हणजे नेमकं काय असतं तुमचं? भोंगा प्रकरणानंतर अयोध्याला जाणार होतो, पण विरोध करणारे हिंदुत्ववाले होते, ज्यांनी हे सगळं केलं, त्याचं पुढे काय झालं? आंदोलनावेळी मनसेच्या १७ हजार कार्यकर्त्यांवर केस टाकल्या, आमच्या वाटेला गेले म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं", अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
मनसेच्या वाटेला गेल्यामुळेच काही लोकांची मुख्यमंत्रीपद गेले असा टोला राज ठाकरेंनी लगावला होती. त्यावर संजय राऊतांनी खोचक टीका केली. "कुणी कुणाच्या वाटेला गेलं नाही. राज ठाकरेंच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद का गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्या पक्षाची आणखी वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सरकार ईडी, सीबीआयचा वापर करून पाडण्यात आले आणि जोडीला खोके देण्यात आले. ईडी काय आहे ते मी राज यांना सांगणार नाही, त्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे," अशी संजय राऊतांनी अतिशय शेलक्या शब्दांत राज यांच्यावर टीका केली.
संजय राऊतांच्या या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोज स्वतःच नको तिथं थोबाड चालवल्यामुळे आणि हिंदुत्व गुंडाळून राष्ट्रवादीची चाकरी केल्यामुळे पक्ष गेला,पक्षाचे नाव गेलं, चिन्ह गेलं, आमदार,खासदार,नगरसेवक गेले…तरी शिल्लक सेनेचे विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करत आहेत...ते म्हणतात ना गिरे तो भी टांग उपर..., असं म्हणत गजानन काळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
दरम्यान, मशिदीवरील भोंगे उतरवणे, पाकिस्तानी कलाकारांना हाकलून लावणे यासारखी सारीच आंदोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केली. स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेणारे पक्ष त्यावेळी काय फक्त चिंतन करीत होते. हिंदुत्वाला मानता म्हणजे केवळ जपमाळ ओढता का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच हिंदुत्ववादी पक्षाच्या कृतीत हिंदुत्व दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. मनसेच्या वाट्याला गेल्याने मुख्यमंत्रिपद गेले, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता मारला. गेली १७ वर्षे सत्ता नसतानाही साथ न सोडणाऱ्या मनसैनिकांचे आभार मानतानाच आपण सत्तेपासून दूर नाही. हे मळभ दूर होईल. कारण लोक राज्यातील सर्व पक्षांना विटलेले आहेत, असे ते म्हणाले.
अत्यंत खालच्या भाषेचा वापर- राज ठाकरे
सध्या महाराष्ट्रात अत्यंत खालची भाषा वापरून हल्ले केले जात आहेत. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले तो महाराष्ट्र इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत आहे. महाराष्ट्राचे काही खरे नाही. सध्या जे सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. २२ तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्यात विरोधकांचे वाभाडे काढण्याचा बुफे तुम्हाला देणार असल्याचे सांगितले.