मुंबई-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात तीन जाहीर सभा झाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाच्या सभा होऊ घातल्या आहेत. यात शिवसेनेची १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा होत आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या परवानगीवरुन मोठा गदारोळ उडाला होता. अखेर अनेक अटी-शर्तींनंतर सभेला परवानगी देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेला डिवचलं आहे. राज ठाकरेंच्या सभेला अनेक अटी घालून देण्यात आल्या, मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी-शर्ती आहेत का?, असा सवाल मनसेचे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी एक ट्विट केलं असून शिवसेनेच्या १४ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेवर टीका केली आहे. "राजसाहेबांच्या संभाजीनगरच्या सभेला अनेक अटी, शर्ती मग शिवसेना पक्षप्रमुखांच्या टोमणे सभेला काही अटी, शर्ती आहेत का? आमचं सरकार आलं की मशिदींवरील भोंगे, रस्त्यावरील नमाज बंद करणार हे बाळासाहेबांचं स्वप्न हिंदुत्वाचा हुंकार म्हणत सभा घेणारे पूर्ण करणार का? बाकी टोमणे सभेला शुभेच्छा..!", असं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.
नकली हिंदुत्ववादी, मनसेचा टोलागजानन काळे यांनी काल शिवसेनेच्या जाहीर सभेच्या टीझरमध्ये मनसेच्या सभेच्या गर्दीचे फोटो वापरल्याचा आरोप केला होता.मागील काही दिवसांपासून भाजपा-मनसे सातत्याने हिंदुत्वावरून शिवसेनेला टार्गेट करत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना उत्तर देण्यासाठी १४ मे रोजी मुंबईत सभेचं आयोजन केले आहे. या सभेचे टीझर प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र शिवसेनेच्या सभेच्या टीझरमध्ये चक्क राज ठाकरेंच्या सभेचे फोटो वापरण्यात आल्याचं सांगत गजानन काळे यांनी शिवसेनेच्या व्हिडिओचे काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.