Join us

'...याला म्हणतात टाइमपास'; तीन खणखणीत ट्विट करत मनसेचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

By मुकेश चव्हाण | Published: February 04, 2021 5:41 PM

मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी तीन खणखणीत ट्विट करत आदित्य ठाकरे यांना सुनावलं आहे.

मुंबई: शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. "विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार हे माझं ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबलं होतं. विरप्पन गँग कशी खंडणी वसुली करते याचे मी आज पुरावे घेऊन आलोय", असं सांगत संदीप देशपांडे यांनी भर पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या सादर करण्यात आल्या. 

शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा याआधीच केली होती. पण तसं काही झालंच नाही. आता शिवसेनेकडूनच फेरीवाल्यांना रितसर पावती देऊन खंडणी वसूल केली जात आहे. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. याशिवाय सार्वजनिक पथाचा वापर करणाऱ्यांना होणार उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणार आकार असं लिहीण्यात आलं आहे", असं संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 

मनसेच्या या आरोपानंतर मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे ती संघटना आहे, की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे", असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. आता आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर मनसेही प्रत्युत्तर दिलं आहे. 

मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी तीन खणखणीत ट्विट करत आदित्य ठाकरे यांना सुनावलं आहे. "मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ" असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते, याला म्हणतात, टाइमपास. 

तसेच कोरोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते, याला म्हणतात, टाइमपास..

"औरंगाबादचं नामांतर 'संभाजीनगर' करू" यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली, याला म्हणतात, टाइमपास, असं म्हणत आदित्य ठाकरेंना कीर्तीकुमार शिंदे यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि शिवसेनेचा वाद आणखी चिघळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, मनसेने केलेल्या आरोपानंतर भाजपानेही शिवसेनेवर टीका केली आहे. राम मंदीराच्या वर्गणीला विरोध करायचा आणि सार्वजनिक पद पथावरच्या लोकांकडून हप्ता वसुल करायचा, असा निशाणा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी साधला आहे. हप्ता वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांचा फोटो कोणी वापरत असेल तर त्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसेलच. मात्र अशा प्रकारे फोटो वापरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. 

टॅग्स :मनसेआदित्य ठाकरेशिवसेनामहाराष्ट्रसंदीप देशपांडेउद्धव ठाकरे