मुंबई - ‘हम डरेंगे नही, झुकेंगे नही, झुकाएंगे’ असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दमदार बॅटिंग केली. केंद्र सरकार, ईडी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडताना त्यांनी भरपूर सिनेस्टाईल डायलॉगही म्हटले आहे. राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी हा फ्लॉप पिच्चर असल्याची टिका केली. भाजप नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला. तर, मनसेनंही या पत्रकार परिषदेला टुकार असं संबोधलं आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी या पत्रकार परिषदेनंतर एक फोटो ट्विट करुन शिवसेनेवर, पत्रकार परिषदेवर आणि मनसेतून शिवसेनेत गेलेल्या एका नेत्यावर टीका केली आहे. आजची पत्रकार परिषद ही टुकार असल्याचं संबोधत मनसेतून गेलेल्यांची अवस्था काय होते, हेच त्यांनी फोटो शेअर करत सूचवले आहे.
जून 2018 मध्ये केला होता प्रवेश
मुंबईत आयोजित शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जून 2018 मध्ये शिशीर शिंदेनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण करुन आपल्या भावनाही व्यक्त केल्या. “उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलो. निघताना त्यांच्या हाताला स्पर्श केला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण झाली.”, असे शिशीर शिंदे म्हणाले होते. हो मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा, बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक होती, असेही ते म्हणाले होते. तेव्हा शिशीर शिंदे हे मनसेचे सरचिटणीस होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, त्यामध्ये भांडुपमधून शिशीर शिंदे विजयी झाले होते.
सोमय्या म्हणतात...खुशाल चौकशी करा
किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, २०१७ मध्ये राऊत यांनी माझ्यावर आणि माझी पत्नी मेधावर असेच आरोप केले होते. आता माझा मुलगा नील याचे नाव त्यांनी घेतले आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री तसेही माझ्याविरुद्ध खटले भरत आहेतच, त्यात पुन्हा एकाची भर. मी व माझ्या कुटुंबाने काहीही चुकीचे केलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राऊत हे कोविड सेंटरच्या घोटाळ्याचे जे आरोप मी केले त्यावर काहीच का बोलत नाहीत? संजय राऊत यांचे प्रवीण राऊत, सुजित पाटकर यांच्याशी काय संबंध आहेत?
शिवसेना घाबरणार नाही
‘हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’ असे सांगताना राऊत यांनी पुरावे म्हणून काही ऑडियो, व्हिडियो क्लिपही आपण लवकरच बाहेर आणू असे जाहीर केले. ‘सुनो ईडीवालो...’असा फिल्मी अंदाजही त्यांच्या बोलण्यात होता. ‘महाराष्ट्र अन् मराठी माणसांवर आक्रमण करणाऱ्यांविरुद्ध रणशिंग फुंकण्यास मी आलो आहे. आम्ही बेईमान नाही. भाजपवाल्यांनी कितीही नामर्दगी करून पाठीत खंजीर खुपसला तरी शिवसेना घाबरणार नाही. आमचेच सरकार राहणार. २०२४ नंतर हे घाबरवणारे कुठे असतील ते बघू, असेही त्यांनी भाजपला बजावले.
सोमय्यांचा दलाल असा उल्लेख
सोमय्याने मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्तीची नको म्हणून कोर्टात याचिका केली होती, असा आरोप करताना राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांचा उल्लेख दलाल असा केला. याचं थोबाड बंद करा नाहीतर आम्ही बंद करू, असेही ते म्हणाले.