“सध्या काही यंत्रणा राबवल्या जातायत. आमची आंदोलनं विस्मरणात कशी जातील याचा प्रयत्न करतायत. टोलच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्रभर हे आंदोलन रेटलं. अनेकांना अटकही झाली. यानंतर ६५ टोलनाके बंदही झाले. ज्यांनी फक्त निवडणुकीच्या तोंडावर टोल बंद करू म्हटलं, ते झालं नाही त्याबद्दल प्रश्न विचारला जात नाही. आम्ही आंदोलनं केली तरी प्रश्न आम्हालाच. १६ वर्षांत किती आंदोलनं केली आणि ती कशी यशस्वी केली याची पुस्तिका आपण काढणार आहोत आणि ती महाराष्ट्र सैनिकांपर्यंत पोहोचवणार आहोत,” असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
“मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचं कारण सांगत होते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणाऱ्यातला मी नाही. स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात घ्यायचा आणि बागेत कोपऱ्यात बसायचं हे धंदे मी करत नाही. मराठीच्या मुद्द्यावर असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल, उद्धव ठाकरेंवर एकतरी केस आहे का? भूमिकाच घेतली नाही. फक्त मला सत्तेत बसवा,” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. मी आधीपासून हिंदुत्ववादी होतो. कट्टर मराठी घरात माझा जन्म झालाय, असंही त्यांनी सांगितलं.
वय काय बोलताय काय?“उद्योगधंद्यांवर त्या दिवशी धोतर बोललं. वय काय, बोलतायत काय? काय चाललंय? राज्यपाल पदावर बसलायत म्हणून मान राखतोय. महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. गुजराती मारवाडी परत गेले तर काय होईल असं महिन्याभरापूर्वी म्हणाले. पहिले त्या समाजाला विचारा आपलं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती, व्यापारी आहात तर आपल्या राज्यात का नाही उद्योग थाटले. याचं कारण तिकडे महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती,” असंही ते म्हणाले. महाराष्ट्र समृद्ध होताच, हे आम्हाला कोश्यारींकडून ऐकायचं नाही. आज त्या लोकांना सांगितलं तर ते आपल्या राज्यात जातील का? सभोवतालचं वातावरण आहे, परदेशातील कोणताही व्यवसाय आणायचा असेल तर त्याचं प्राधान्य महाराष्ट्रच असतो, असंही ते म्हणाले.