Join us

Raj Thackeray 'आम्ही दुधखुळे नाही, मराठी माणसाला डिवचू नका'; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 11:55 AM

राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांकडून टीका होत आहे. दरम्यान, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील राज्यपालांना इशारा दिला आहे. त्यांनी एक पत्र देखील ट्वीट केलं आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत इशाराही दिला आहे. ‘आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात,’ असं त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

‘मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो,’ असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.काय म्हणाले होते राज्यपाल?“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

टॅग्स :मनसेराज ठाकरेभगतसिंग