उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 08:09 AM2020-01-22T08:09:18+5:302020-01-22T08:11:19+5:30
जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं
मुंबई - राज्यातील गृहविभागाने मुंबईतील पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी पुन्हा अश्वदल कार्यरत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे तब्बल ८८ वर्षानंतर शहरात मुंबई पोलीस घोड्यांवरुन पेट्रोलिंग करताना पाहायला मिळणार आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर मनसे नेते संदीप देशपांडे टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलंय की, जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं "उद्धवा अजब तुझे सरकार" अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं "उद्धवा अजब तुझे सरकार" pic.twitter.com/MhOnra2x6t
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 22, 2020
मुंबई पोलीस दलात येत्या २६ जानेवारीपासून अश्वदल पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली होती. ब्रिटिश काळात मर्यादित लोकसंख्या असताना त्यांच्या जिवीत व मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी अश्वदलावर होती. पुन्हा एकदा शहरात ३० अश्व आणि त्यावर स्वार वर्दीधारी सिमेंटच्या रस्त्यावर दौड करताना दिसणार आहेत. एकेकाळी मुंबईची शान राहिलेल्या अश्वदलाचा तब्बल ८८ वर्षाच्या खंडानंतर पुन्हा त्यांच्या नाळेचा आवाज खडखडणार आहे.
सशस्त्र विभागाच्या (एलए)च्या अखत्यारित अश्वदलाची जबाबदारी राहणार आहे. मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे.
अश्वदलातील कुमूक
पोलिसांच्या अश्वदलामध्ये ३० घोडे असणार असून प्रत्येकी एक फौजदार व सहाय्यक फौजदार असतील. तर ४ हवालदार व ३२ कॉन्स्टेबलचा समावेश असणार आहे. फौजदाराकडून या दलाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करुन मनसेने विरोधकांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केले आहे. उद्या मुंबईत मनसेचं पहिलं महाधिवेशन होणार असून यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या भूमिकेत येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मराठीचा मुद्दा प्रभावीपणे मांडून त्यात फारसं यश मनसेला मिळालं नाही त्यामुळे पक्षाची धोरणं आणि नवी वाटचाल अधिवेशनात ठरवली जाणार आहे.