मुंबई/ पुणे: पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यावरून, विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी फेसबुकद्वारे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारला बलात्कार करणाऱ्यावर कारवाई करता येत नसेल, तर त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंगा करु, असं म्हणत इथं न्याय होणारच, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली.
गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने जबर जखमी झालेल्या अबलेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. माणुसकीला काळिमा फासणारे हे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. मोहन चौहान, असे या क्रूरकर्म्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा आहे. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी-
साकीनाक्यातील खैरानी रोड येथे महिलेवर अत्याचार करून क्रूरतेने हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी सबळ पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद मुंबई महिला विभागातर्फे करण्यात आली आहे. याबाबत रविवारी साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकाची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.