“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 15:09 IST2025-04-20T15:07:20+5:302025-04-20T15:09:08+5:30
MNS Sandeep Deshpande News: बँकांमध्ये हिंदीकरण यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भूमिका घ्यायला पाहिजे, असे मनसेने म्हटले आहे.

“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
MNS Sandeep Deshpande News: राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा हा सुरू सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला शनिवारी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पत्रकारांशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरे सेनेवर टीका केली आहे. अनेक विषय आहेत, महाराष्ट्रातील काही उद्योग बाहेर जात आहे, दादागिरी सुरू आहे. या मुद्द्यांवर सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. निवडणुका येतात, जातात, पण फक्त एखादा विषय निवडणुकी पुरते येणे, करंटेपणा आहे, सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजे. मग ठाकरे बंधूच का, अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?
महाराष्ट्रद्रोही कोण? हे विचारण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. बात निकलेगी तो बहोत दूर तक जायेगी, असे सांगत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, भोंग्यांसाठी आमच्यावर १७ हजार केसेस टाकल्या. ही चूक उद्धव ठाकरे यांना वाटत आहेत का, जर वाटत असेल, तर मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा थेट प्रश्न संदीप देशपांडे यांनी केला. तसेच यापूर्वी दोनदा ठाकरे गटाने आम्हाला दगा दिला. २०१७ मध्ये युतीची चर्चा सुरू होती. यासाठी मी या घडामोडीमध्ये होतो. मी त्याचा साक्षीदार आहे. २०१७ मध्ये बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. मात्र तेव्हा उद्धव ठाकरे वरील मजल्यावरुन तळ मजल्यावर आले नाहीत. महाराष्ट्रासाठी ज्यांना प्रेम आहे, त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही भूमिका राज ठाकरेंनी मांडली, असे मला वाटते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आत्ता विषय हिंदी सक्ती, बँकांमध्ये हिंदीकरण यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भूमिका घ्यायला पाहिजे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. तर, दुसरीकडे मनसे नेते अमेय खोपकर यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे.