Maharashtra Political Crisis: “संजय राऊत स्वातंत्र्य सेनानी नाहीत, भ्रष्टाचारप्रकरणी अटक झालीय”; ‘रोखठोक’वरुन मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 01:56 PM2022-08-07T13:56:14+5:302022-08-07T13:57:03+5:30
Maharashtra Political Crisis: संजय राऊत सध्या ईडी कोठडीत असून, त्यांच्या रोखठोक सदरावर मनसेकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. अनेक तासांच्या चौकशीनंतर अखेर संजय राऊत यांना ईडीने अटक केली. विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांची कोठडी वाढवली असून, आता ०८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. यातच आता ‘सामना’च्या रोखठोक सदरात राज्यपालांवर टीकास्र सोडण्यात आले आहे. मात्र, हे सदर संजय राऊत यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आल्याने मनसेने ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सामनामधील रोखठोक सदरावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक असलेल्या आरोपीला कारागृहातून लेख लिहिण्याची परवानगी आहे का? कारण ते काही स्वातंत्र सैनिक नाहीत किंवा त्यांच्या नावाने दुसरे कोणी लेख लिहित आहेत का? कोणी डुप्लीकेट संजय राऊत तयार झाले आहेत का? असे प्रश्न सामान्य जनतेला पडत आहेत. ते प्रश्न आम्ही उपस्थित केले आहेत, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
संजय राऊत स्वातंत्र्य सेनानी नाहीत
सामनामध्ये संजय राऊत यांचे रोखठोक हे सदर आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले राऊत हे काही स्वातंत्र सेनानी नाहीत की, त्यांना जेलमधून लेखनाची परवानगी मिळावी, की त्यांच्या नावावर दुसरेच कोणी लिहित आहेत?, असा सवाल उपस्थित करणारे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
दरम्यान, सामनाच्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांच्या नावाने लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कोणी खेळ केलाच तर मराठी माणूस उसळून बाहेर पडतो, हा इतिहास आहे, असे यात म्हटले आहे.