मुंबई: राजकीय बंद यशस्वी करण्यासाठी अनेकदा व्यापाऱ्यांवर दुकानं बंद करण्याची सक्ती केली जाते. यामुळे राजकीय पक्षांचा स्वार्थ साधला जात असला, तरी व्यापाऱ्यांचं मात्र नुकसान होतं. त्यामुळे यापुढे राजकीय पक्षांनी पुकारलेल्या कोणत्याही बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने मंगळवारी घेतला. यावर पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, मात्र आता सरकाराचं बंद पुकारत असल्यामुळे व्यापारांनी कोणत्याही राजकीय पक्षांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. यावर संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र बंद हा राज्याचे सरकारच पुकारत असल्याचा आरोप केला आहे.
नागरिकत्व सुधारित कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या दोन वेगळ्या गोष्टी आहे. मनसेचा सीएए कायद्याला विरोध असून एनआरसी कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आधीही आपल्या भाषणातून भारतात असलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना हकलून द्या असा उल्लेख केला होता असं देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. बंद यशस्वी व्हावा यासाठी मुंबईमध्ये काही आंदोलक हे रेल रोको करण्यासाठी ट्रॅकवर उतरले होते. कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाने रेल रोको केला. या रेल रोकोचा फटका मध्य रेल्वेला बसला असून वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू असून यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रॅकवरुन हटवलं असून ताब्यात घेतलं आहे. यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.