भाजपा- मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:29 PM2022-04-04T13:29:57+5:302022-04-04T13:30:06+5:30

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे.

MNS leader Sandeep Deshpande has clarified that there is no proposal of BJP-MNS alliance at present | भाजपा- मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

भाजपा- मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात...; संदीप देशपांडेंनी स्पष्टच सांगितलं!

Next

मुंबई- मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसंच अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपलं परखड मतही मांडलं. अनेकांनी यानंतर राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अशातच गुढी पाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि गडकरी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजपा आणि मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नसल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

संदीप देशपांडे ट्विटरद्वारे म्हणाले की, एक तर गोष्ट स्पष्ट आहे की, भाजप मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण मनात प्रश्न येतो शिवसेना, राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला, तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. 

राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांच्यापासून मोहित कंबोज यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं समर्थन केलं. प्रविण दरेकर यांनीदेखील राज ठाकरे यांचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं होतं असं म्हटलं होतं.

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण, राज यांनी आपल्या भाषणात भाजपवर एक शब्दही टीका केली नाही. याउलट शिवसेनेला टार्गेट केले. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. मात्र, या भेटीबाबत स्वत: गडकरींनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

राज ठाकरेंच्या कुटुंबीयांशी माझे गेल्या 30 वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे, त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी आणि त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी मी शिवतिर्थ या बंगल्यावर पोहोचलो. या भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही. या भेटीकडे कौटुंबिक स्नेहभेट म्हणून बघता येईल,'' असेही गडकरींनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

काय म्हणाले होते दरेकर ?

भारतीय जनता पक्षाची विचारधारा, हिंदुत्वाची भूमिका, महाराष्ट्र मागे चाललाय यासंदर्भातील भूमिका अशी मिळती जुळती भूमिका भाजपचीही आहे. येणाऱ्या काळात काय होईल हे माहित नाही. परंतु निश्चितच त्यांची भूमिका भाजपच्या विचारधारेला सुसंगत आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चिंता करणारी आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेवर टीका केली. आमच्या दृष्टीनं त्यांच्या भूमिका स्वागतार्ह आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं चांगल्या वाटत असल्याचंही ते म्हणाले होते.

Web Title: MNS leader Sandeep Deshpande has clarified that there is no proposal of BJP-MNS alliance at present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.