'आज तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे'; मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:08 AM2022-06-08T09:08:46+5:302022-06-08T09:09:28+5:30
मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी टीका केली आहे.
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या 'हिंदुत्वाचा हुंकार' या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात १० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकांत सर्वत्र भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मनसेने मात्र निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.
तत्वा साठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 8, 2022
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील याच मैदानात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेला आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नामांतरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड
मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामकरणाचा मुद्दा सध्या जोर धरत आहे. दरम्यान, या शहरांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नसून, काहीजण हवेत बाता मारत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. 'लोकमत'शी बोलताना कराड यांनी ही माहिती दिली.