Join us

'हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली;' मनसेचं उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 8:51 AM

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई: मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आणि त्यांच्या व्यथा मांडत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटलं आहे की, प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलीच शिवाय त्याला साजेस पक्षचिन्हही निर्माण केलं. ते म्हणजे 'धनुष्यबाण'.. महाभारत ते रामायण काळापासून धनुष्यबाण हा हिंदु धर्मातलं महत्वाचं प्रतिक आहे. परंतु आपला पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ताभोगात मग्न असल्यापासून हिंदुत्वाचा विसर पडलाय हे आम्हाला मान्यच आहे. परंतु आत्ता आपल्याला धनुष्यबाणाचाही विसर पडलेला दिसतोय हे पाहून वेदना होतात. कारण दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात चालत असेलेलं धनुर्विद्या प्रशिक्षण अनेक वर्षापासून बंद आहे. 

प्रशिक्षण सुरू असताना चुकीने एक बाण तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला. यात कुणालाही इजा झाली नाही. परंतु तरीही आपण हे धनुर्विद्या प्रशिक्षण बंद करण्याचा आदेश कम 'फतवा'च  काढल्याच समजतंय.  शिवसेनेचं काय दुर्भाग्य व विरोधाभास म्हणावा, ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्याच चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा वाटतोय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.  

धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आज निराशेत आहेत. त्यांना सरावाला जागा नाही.  आपण आमदार आणि सभागृहनेत्यांना आर्चरी क्लबसाठी पर्यायी जागा देण्यास सांगितले होते.  त्याप्रमाणे आर्चरी क्लबने स्थानिक आमदार, नगरसेविका व सभागृहनेत्या तसेच महापालिकेशी पत्रव्यवहार केला पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली.  ज्या धनुर्विद्येसाठी शिवसेना पक्ष प्रमुखांचं ऐकलं जात नसेल तर शिवसेनेला आपलं पक्ष चिन्ह धनुष्यबाण ठेवण्याचा नैतिक अधिकार आहे का? का बाळासाहेबांची शिवसेना आता फक्त हवेतील बाणच मारण्यात पटाईत आहे? असा सवाल खेळाडूंच्या मनात आहे, असं संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटलं आहे. 

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, ही अवस्था जर खेळाडूंची होत असेल तर ऑलिम्पिंगमध्ये भारताला पारितोषिक कसं मिळणार? जे खेळाडूंचं प्रशिक्षण बंद पाडून खच्चीकरण करतायेत त्यांना ऑलिम्पिंगमधील खेळाडूंना 'वर तोंड' करून शुभेच्छा देण्याचा कोणता अधिकार आहे?   ज्या प्रमाणे कॉमनवेल्थ गेम्समध्ये काँग्रेसने भ्रष्ट्राचार केला होता, कदाचित आघाडीत जाऊन शिवसेनेनेही हाच तर कॉमन मिनिमन प्रोग्राम तर आखला नाही? असा प्रश्न क्रिडा प्रेमींना आणि धनुर्विद्या चाहत्यांना पडला आहे.

खरंतर तेव्हाचे महापौर निवास, प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मधील संयुक्त भिंतीची उंची वाढवून हा प्रश्न सोडवता आला असता. परंतु आपण त्याकडेही लक्ष दिले नाही. पण आता याला परवानगी दिली जावी आणि हे खेळाडूंचे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करावे.. तसेच लांब पल्ल्याच्या सरावाकरता १०० बाय ३०० मीटरचे सुरक्षित आणि पूर्णवेळ मैदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.

प्रशिक्षण चालवणाऱ्या संस्थेनं अनेक पदकं मिळवत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे. या संस्थेसाठी नाही पण आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा धनुर्विद्येसाठी तरी आपण आर्चरी क्लबला सरावाकरता जागा  मिळवून द्यावी. अन्यथा आपले पक्षचिन्ह विसर्जीत करत जमिन हडपणारा 'पंजा' किंवा संधीसाधू 'घड्याळ' तरी करावे, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेमनसेसंदीप देशपांडेशिवसेना