मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात उत्तर सभा घेताना मशिदीवरील भोंगे यावर परखड भूमिका मांडली. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे सरकारने मौलवींसोबत चर्चा करून हटवावे अन्यथा मशिदीसमोर भोंगे लावत हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे.
राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन महाविकास आघाडीमधील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारमधील विविध नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. मात्र राज ठाकरे याबद्दल एकही शब्द काढत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली.
राज ठाकरेंनी पाडव्याच्या आणि ठाण्याच्या सभेत महागाई, इंधन दरवाढीवर एकही शब्द काढला नाही, त्याचे नेमकं कारण काय?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. तसेच महागाई कशी वाढली, हे भोंग्यांमधून सांगावं, असा टोला देखील शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला. यानंतर मनसेनेही या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, महागाईवर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, कोरोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता, तेंव्हा लोकांच्या समस्या पण राज ठाकरेंनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडरमधलं कमिशन खाणार का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मूळ मुद्द्यांना बगल दिली. काल त्यांनी एवढं मोठं भाषण केलं, त्यामध्ये सामान्य जनतेच्या सुख दु:खासंबंधी एकही प्रश्नांचा उल्लेख नव्हता. ज्या पद्धतीने भाजप देश चालवतोय, त्यासंबंधीचा उल्लेख देखील राज ठाकरेंच्या भाषणात नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाची दखल घ्यावी, असं मला वाटत नाही, त्यावर अधिक बोलणं उचितही नाही", असं शरद पवार म्हणाले.