"आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर अन् लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही"; मनसेचं प्रत्युत्तर
By मुकेश चव्हाण | Published: November 24, 2020 11:36 AM2020-11-24T11:36:00+5:302020-11-24T11:36:21+5:30
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसलेली असताना शिवसेनेनेही मिशन मुंबई हाती घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीत शिवसैनिकांना निवडणुकीसाठी तयारीत राहण्याचे आदेश दिले. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा-मनसे एकत्र येणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याच दरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्ययांना घ्यावी लागेल, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी केली होती. अनिल परब यांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं आहे. आम्ही पोटात एक ओठात एक असं केलं नाही. २०१९ च्या निवडणुकीत आम्हाला जी भूमिका देशहिताची वाटली ती आम्ही देशासमोर मांडली, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही. तसेच शिवसेनेनं मराठी आणि हिंदू लोकांसोबत दगाबाजी केली. त्यामुळे आताची शिवसेना ही दगाबाज शिवसेना असल्याचे सांगत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी, अनिल परब यांनी भाजपा-मनसे संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर बोचरी टीका केली होती. अनिल परब म्हणाले की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही. मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही. त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल. मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे.आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी मनसेने घेतली आहे. ज्या भाजपा नेत्यांना लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ माध्यमातून उघडंनागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला होता.
भाजपाला सत्तेत येण्यासाठी ५ वर्ष स्वप्न पाहावं लागेल
सत्तेवर येण्यासाठी भाजपाला ५ वर्ष स्वप्न बघतच काढायची आहे आणि ५ व्या वर्षी पुन्हा एकदा भाजपाचं स्वप्नभंग होणार आहे, सत्तेविना भाजपा अस्वस्थ झाली आहे, त्यामुळे कार्यकर्ते कुठेही जाऊ नये यासाठी भाजपा नेत्यांना सत्ता येणार असल्याची विधान करावी लागतात. पुढचं सरकार दिवसाढवळ्या येईल तेदेखील शिवसेनेचे असेल असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाट आली तरी सरकार सज्ज
कोरोनाचं संकट राज्य आणि देशासमोर आहे, कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची जी काळजी घेतली त्याचं जगानं कौतुक केले आहे. काळजी घेणं आपल्याला गरजेचे आहे, लॉकडाऊन करावं या मताचं सरकार नाही, उद्या कोरोनाची लाट आली तर त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तयार केली आहे. कोरोना लाट आली तर कडक निर्बंध करावे लागतील. विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे. कोरोना कसा हाताळायचा हे माहिती झाल्याने त्यासाठी पूर्ण तयारी आहे अशी माहिती अनिल परब यांनी दिली.