Join us

'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा

By मुकेश चव्हाण | Published: October 31, 2020 3:45 PM

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र संजय राऊतांच्या या टीकेवर मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी  राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. तसेच फोटो ट्विट करुन 'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत' असं म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 

पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी राज्यपालांची घेतलेल्या भेटीवरही टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली होती.

दरम्यान, सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती.

शरद पवारांचा सल्ला घेतल्यानं कोणाच्या पोटात दुखू नये

एकापेक्षा जास्त पक्ष येऊन सरकार येतं, तेव्हा त्या आघाडीतला प्रमुख नेता जो आहे त्यांचा सल्ला घेतला जातो, युती सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांचा सल्ला घेतला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सल्ला दिला म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, नरेंद्र मोदीही शरद पवारांचा सल्ला घेतात, शरद पवार देशातील सगळ्यात अनुभवी, संयमी नेते आहेत, ते आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत, त्यांच्याकडून सल्ला घेतला नाही, तर आमच्यासारखे दुर्दैवी आणि करंटे आम्हीच आहोत असं संजय राऊत म्हणाले.

राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?- राज्यपाल

राज्यपाल आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान काही  किस्सेही घडल्याची माहिती समोर आली. राज ठाकरे राजभवनात दाखल होताच १ वर्षापासून मी तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्राच्या 'राज'चे आज दर्शन झाले, असं राज्यपाल म्हणाले. तसेच राज आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?, असा सवाल राज्यपाल यांनी राज ठाकरेंना केला. राज्यपालांच्या या प्रश्नावर 'मै हिंदी पिक्चर बहुत देखता हूँ इसिलिये', असं मजेशीर उत्तर राज ठाकरेंनी राज्यपालांना दिलं.

टॅग्स :राज ठाकरेसंजय राऊतभगत सिंह कोश्यारीशिवसेनामनसेसंदीप देशपांडे