मुंबई: गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरीदिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र आजचं आंदोलन काँग्रेसने पुकारलेलं आंदोलन असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे. व्यापाऱ्यांची जी मक्तेदारी आहे ती मोडित काढली पाहिजे, अशी मनसेची नेहमी भूमिका राहिलेली आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. केंद्र सरकारचा कृषी विधेयक कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असं आज जे बोलत आहेत, ते राज्यसभेत हा विषय सुरु असताना गप्प का राहिले. तसेच राज्यसभेत कृषी कायद्याविरोधात आवाज का उठवला नाही, असा सवाल संदीप देशपांडे यांनी नाव न घेता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारला आहे.
काँग्रेसने एखादी घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी योग्य आहे आणि इतर लोकांची विरोधातली आहे, असं होऊ शक नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे कृषी कायद्याबाबत राज्यातील शेतकऱ्यांशी बोलून, शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत, यावर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतील, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, लोकं स्वयंस्फूर्तीने सहभागी - संजय राऊत
गेल्या 10 ते 12 दिवसांपासून शेतकरी थंडी वाऱ्याच्या पर्वा न करता, सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमारेषेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणं हे देशातीलच नाही, तर जगातील नागरिकांचं कर्तव्य आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जगातील अनेक ठिकाणी मोर्चे निघाले आहेत. सरकारने मनं मोठं करून विचार केल्यास, आंदोलनामुळे तणावाखाली येण्याची सरकारला गरज नाही. कारण, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची व्यथा ऐकायलाच हवी, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशभरात बंदला चांगला प्रतिसाद असून लोकं उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी आहेत, असेही राऊत यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीचा ‘भारत बंद’ला पाठिंबा
शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला प्रदेश काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
केंद्राचे कृषी कायदे फायद्याचे - फडणवीस
कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आंदोलनातील काही गटांना आंदोलन असेच चालू ठेवायचे असून त्यावर तोडगा काढायचा नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे माहिती असूनही राजकीय विरोधासाठी काहीजण झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.