मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यभरात बुधवारी २२५० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३९२९७वर पोहोचला आहे. तर आतापर्यत १३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनासारख्या महामारीमुळे सध्या सरकारसह सर्वसामान्यांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहेत. हातावर पोट असलेले लाखो लोक सरकारच्या, स्वयंसेवी संस्थांच्या व दानशूरांच्या मदतीवरच तगून आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच एनेक राजकीय पक्ष, नेत्यांकडूनही गरजूंना मदत करण्यात येत आहे. मात्र शिवसेनेकडून करण्यात आलेल्या एक मदतीवर मनसेने जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेनेकडून कुलाबा विधानसभेच्या परिसरात महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आले होते. मात्र या पॅड्सच्या पॅकेटवर मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही आदित्य ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. याच सर्व प्रकरणावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही का, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता म्हणतील राजकारण नको, असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहेत. यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मदत करताना फोटो न काढण्याचे आवाहन केले होते. कॅमेऱ्याकडं बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणं, मदत स्वीकारणाऱ्यास कॅमेऱ्यात बघण्यास सांगणं अशा चुकीच्या गोष्टी काही लोक करत आहेत. ज्याला आपण मदत करत आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला लाजवत नाही का? असं करून एखाद्याला शरमेनं मान खाली घालायला लावणं कितपत योग्य आहे,' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.