मुंबई: भाजपा व शिवसेनेमध्ये राज्यात सत्तास्थापनेवरुन वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु केली होती. मात्र तिन्ही पक्षांची विचारधारा भिन्न असल्याने सरकार कसं काय स्थापन करणार यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच मनसेने देखील शिवसेनेच्या या भूमिकेवर टोला लगावला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत हल्ली आपले गुण जुळतात की नाही हे न पाहता लग्न जमवतात त्यांच्यासाठी शुभ मंगल सावधान असं म्हणत शिवसेनेला चिमटा काढला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकाही सुरू आहेत. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे, तसेच काँग्रेसबाबतचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याने सरकार स्थापनेस विलंब होत आहे. त्यातच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील महाशिवआघाडीसोबत सरकार स्थापन करण्यास सकारात्मकता दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस तयार; पवारांच्या भेटीनंतर सोनिया गांधींची मंजुरी?
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत कसलीही चर्चा सुरू नसल्याचं पवारांनी म्हटलं होतं. मात्र, आता पवारांनीच शिवसेनेसोबत बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितले होते. त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार की नाही याचे उत्तर आगामी काही दिवसात मिळणार आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.