Join us

जनता न्यायालयानं मनसेला सूचली आगळीवेगळी कल्पना;उद्धव ठाकरेंना लगावला उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 1:11 PM

उद्धव ठाकरेंच्या या जनता न्यायालयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई: लवादाने जो निकाल दिला त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. शेवटची आशा म्हणून थेट जनतेच्या न्यायालयात आलो आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाने माझ्यासोबत येऊन जनतेत उभे राहावे. तिथे त्यांनी सांगावे की शिवसेना कुणाची मग जनताच ठरवेल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रतेसंदर्भातील निकालानंतर हा निकाल कसा लोकशाहीविरोधी आहे, हे पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळी डोम येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि वकील व्यासपीठावर उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला सभेसारखी गर्दी झाली होती. सुरुवातीला वकिलांनी कायदेशीर बाजू मांडल्या आणि नंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.  

उद्धव ठाकरेंच्या या जनता न्यायालयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले की, महाराष्ट्र सैनिकांना माहितीच असेल की, आपल्या अंगावार विविध गुन्हे असतील. मग त्या आंदोलनाच्या असतील, रस्ता रोकोच्या असतील, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेलं आंदोलन असेल, भोंग्याबाबत केलेलं आंदोलन असेल, यावेळी आपल्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सगळे गुन्ह्यांतून सुटका करण्यासाठी आपल्याला काल उबाठा गटाने एक महत्वाची आयडिया दाखवलेली आहे. ती म्हणजे जनता न्यायालय, असं संदीप देशपांडे म्हणाले.

जिकडे न्यायालयात तुम्हाला वर्षंभर केसेस लढवावी लागते. त्यामध्ये न्याय मिळेल की नाही याची अपेक्षा नसते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या शाखांमध्ये जनता न्यायालय बसवावं. आपल्या जेवढ्या महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे असतील. त्यातून निर्दोष मुक्तता जनता न्यायालयातून करुन घ्यावी, असा उपरोधिक टोला संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. गरज भासल्यास वकिलांना देखील बोलवावं. म्हणजे आपलेच वकील, आपलेच न्यायालय आणि आपलाच निर्णय...याचापेक्षा चांगला मार्ग आपल्याला मिळू शकत नाही, अशी टीका देखील संदीप देशपांडे यांनी केली आहे. 

दरम्यान, शर्मिला ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावं लागलेलं आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय, असा टोला महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या शर्मिला ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी टीका केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेसंदीप देशपांडेमनसेशिवसेना