दसरा मेळाव्यावरुन शिंदे अन् ठाकरे गटात रस्सीखेच; मनसेने सांगितली 'एकच' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:16 AM2022-08-30T10:16:08+5:302022-08-30T10:16:49+5:30
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन होणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर मोठे भगदाड शिवसेनेला पडले आहे. मात्र, आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यातच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गट हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा सुरू आहे.
शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात. मात्र, यंदा शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. याचदरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे...आजच्या घडीला दोन्ही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 'वारसा' हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो'..., असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे.
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" pic.twitter.com/bkTLZaEXMm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2022
दरम्यान, शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टींवर दावे ठोकण्याचा सपाटा दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. अशावेळी यंदाच्या दसरा मेळाव्याला अधिकच महत्त्व आहे. यावेळी शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आखडता हात घेतल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी याबाबत संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार- किशोरी पेडणेकर
प्रत्येक वर्षी गणेशोत्सव झाल्यानंतर शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या अर्जाबाबत आयुक्त निर्णय देत असतात. तुम्ही हवे तर दरवर्षीचे रेकॉर्ड तपासा. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. गणेशोत्सवानंतरच यावर निर्णय होईल. कोणी काही म्हणत असले, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा घेणार, असे शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले.