मुंबई: उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे तीन नेते यांच्यात एक गुप्त बैठक झाली. मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीमुळे भाजपा आणि मनसेच्या युतीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबत पत्रकारांनी संदीप देशपांडे यांना विचारले असता, ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती, असं म्हटलं आहे. तसेच भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेच निर्णय घेतील. राज ठाकरे जो आदेश देणार त्याला आमचा पाठिंबा असेल, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीबाबत निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयावरही संदीप देशपांडे यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीने जे पेरले तेच उगवले. नियतीने वर्तुळ पूर्ण केले, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
मनसेचं ट्विट-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहे. विविध राजकीय नेते या निर्णयावर आपलं मत मांडत आहे. याचदरम्यान मनसेने देखील अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का?, असा सवालही उपस्थित केला आहे.