Join us  

'भाजपाला आता लोक कंटाळली'; मनसेचा थेट देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 11:20 AM

राज ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

मुंबई- मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. पण या सर्व चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा 'एकला चलो रे' चा नारा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे विदर्भ दौरा करणार आहेत. 

१९ रोजी दुपारी ४ वाजता ते चंद्रपूरसाठी रवाना होतील. चंद्रपूरची बैठक आटोपून २० रोजी दुपारी ४ वाजता ते अमरावतीला रवाना होतील. अमरावतीला २१ रोजी संघटनात्मक आढावा घेतील व २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी रेल्वेने मुंबईला रवाना होतील. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी तीनही शहरात नियोजन केले जात असून या दौऱ्याचा पक्षासाठी निश्चितच फायदा होईल, असा दावा प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी 'लोकमत'शी बोलताना केला.

राज ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला या महापालिकेच्या निवडणुका देखील पूर्ण ताकदीने आणि मोठी तयारी करुन लढवणार आहेत. त्या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

संदीप देशपांडे यांनी यावेळी भाजपावरही निशाणा साधला. विदर्भात जी काही शहराची अवस्था झालीय. आतापर्यंत अनेक वर्षे नागपूरात सत्तेत असलेला भाजपा आणि नागपूरची झालेली अवस्था, यावर आता लोकांनीही आता विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता नवीन लोकांना संधी द्यायची आहे. नागरिक जून्या लोकांना कंटाळली आहेत, असं संदीप देशपांडे म्हणाले. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी आजवर नागपूर किंवा विदर्भावर विशेष फोकस केला नव्हता. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये पश्चिम नागपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते नागपूर मार्गे वणी येथे प्रचारासाठी गेले होते. हे दोन प्रसंग वगळता त्यांनी नागपुरात संघटनात्मक आढावा बैठक घेतलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करणार आहेत. रात्री इतर पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीही होणार आहेत.

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीससंदीप देशपांडेमनसेभाजपा