"आमचा मुख्यमंत्री जगात भारी"; देशात नंबर १ ठरलेल्या उद्धव ठाकरेंना मनसेने लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:34 PM2021-07-16T14:34:43+5:302021-07-16T14:35:01+5:30
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यांमधील परिस्थिती आणि मुख्यमंत्र्यांची कामगिरी यांवर चर्चा सुरू आहे. तसेच अनेक राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विद्यामान मुख्यमंत्र्यांबाबत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून अनेकविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेही चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यातच आता 'प्रश्नम' यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरल्याचं समोर आलं. देशात ६७ टक्के लोकसंख्या असलेली १३ राज्ये या सर्व्हेसाठी निवडण्यात आली होती.
प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कमागिरीसंदर्भात जनतेचं मत जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाबद्दल आपण समाधानी असून पुन्हा त्यांना मतदान करु असं म्हणणाऱ्यांची संख्या ४९ टक्के इतकी आहे. मात्र या सर्वेक्षणावरुन मनसेने टोला लगावला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे, लक्ष्मी रोडची मिसळ, जगात भारी...पुण्याची मस्तानी जगात भारी..चितळेंची बाकरवडी जगात भारी..तसाच तो सर्वे वाटतोय..''आमचा मुख्यमंत्री जगात भारी'', असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
पुण्यात अशी म्हणायची पद्धत आहे लक्ष्मी रोड ची मिसळ "जगात भारी"पुण्याची मस्तानी"जगात भारी" चितळें ची बाकरवडी " जगात भारी" तसाच तो सर्वे वाटतोय आमचा मुख्यमंत्री "जगात भारी"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 15, 2021
दरम्यान, बिहार, गोवा, गुजरात, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगना, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडु, केरळ, आसाम या राज्यांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात पॅनेल नसल्यामुळे तेथील सर्व्हे करता आला नसून, पुढील फेरीत या राज्यांमध्ये सर्व्हे केला जाईल, असे प्रश्नमकडून सांगण्यात आले आहे.
१३ राज्यांतील १७ हजार ५०० जणांनी सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब आहे आणि त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये, कामगिरी चांगली असली तरी पुन्हा मत देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे आणि पुढीलवेळी हेच मुख्यमंत्री हवेत, असे पर्याय देण्यात आले होते. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण, याला सर्वाधिक मते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाली आहेत. सर्व्हेमध्ये जवळपास ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असून, त्यांना पुन्हा मतदान करू असे म्हटले आहे.
टॉप तीनमध्ये कोण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि आम्ही त्यांना पुन्हा निवडून देऊ असं महाराष्ट्रातून सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास निम्म्या मतदारांनी (४९ टक्के) म्हटलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही ४४ टक्के मतांनी पसंती दर्शवल्याने ते दुसर्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. ४० टक्के मतदारांनी गहलोत यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.