विरोधकांची बैठक झाली, त्याबद्दल अभिनंदन, फक्त एकच विनंती...; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 12:24 PM2023-06-24T12:24:30+5:302023-06-24T12:24:58+5:30
विरोधकांच्या या बैठकीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी पाटण्यातील बैठकीत घेतला. तथापि, नियोजनाबबत पुढील महिन्यात शिमला येथे आगामी नियाेजनाबाबत सल्लामसलत करण्याचेही यावेळी ठरले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह १७ पक्षांचे जवळपास ३२ प्रतिनिधी हजर होते.
देशाच्या अखंडतेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशात हुकूमशाही आणणाऱ्यांना आम्ही विरोध करु. सुरुवात चांगली असेल, तर भविष्यात सर्वकाही चांगले होईल, असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर सांगितलं. विरोधकांच्या या बैठकीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे. विरोधी पक्षांची बैठक झाली त्याबद्दल अभिनंदन! फक्त सर्वांना एकाच विनंती, टोमणे सम्राटांना पंतप्रधान बनवू नका. नाहीतर पंतप्रधान फेसबुकवर आणि अख्खा देश वर्क फ्रॉम होम, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
विरोधी पक्षांची बैठक झाली त्याबद्दल अभिनंदन !फक्त सर्वाना एकाच विनंती टोमणे सम्राटांना पंतप्रधान बनवू नका नाहीतर पंतप्रधान फेस बुक वर आणि अख्खा देश वर्क फ्रॉम होम!!!
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 24, 2023
दरम्यान, आम आदमी पक्षाने दिल्लीशी संबंधित केंद्राच्या वटहुकुमावर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे सांगून विरोधी ऐक्याच्या संपूर्ण प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वटहुकमावर ‘आप’चे समर्थन करण्याच्या मुद्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्वत: पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.