Join us

'काल म्हटलेलं वाक्य संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा, नाहीतर पुन्हा पलटी माराल'; संदीप देशपांडे यांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 11:51 IST

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे. 

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ पासून याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे.

देशातील अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. सरकार आणि विरोधक दोघांची धाकधूक वाढली असून, निकाल आमच्याच बाजूने येईल, असा दावा दोन्ही बाजूने केला जात आहे. तसेच ठाकरे गट असो की शिंदे गट दोन्ही गटाकडून आमचा न्यायालयावर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देतील, अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे. 

आमचा न्यायालयावर विश्वास आहे...हे काल म्हटलेलं वाक्य संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा नाहीतर पुन्हा पलटी माराल. आणि हा विकला गेलाय तो विकला गेलाय चालू होईल, असं संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेचा कायदा अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे १६ सदस्य कायद्याच्या आधारावर अपात्र घोषित व्हायला हवेत, असे मला वाटते. तरीही, निकालाविषयी काही एक सांगता येत नाही. मात्र, सध्याच्या सरकारविरोधात निकाल गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे, असे मत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :संदीप देशपांडेएकनाथ शिंदेमनसेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष